पिके वाळल्याने शेतकरी संकटात; तातडीने पंचनामे
करून सरसकट नुकसानभरपाई देण्याची मागणी
अलिम चाऊस
गंगापूर : दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. पावसाअभावी खरीप पिके वाळू लागल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. अनेक शेतकऱ्यांवर उभी मका जनावरांच्या चाऱ्यासाठी कुट्टी करून देण्याची वेळ आली आहे.
तालुक्यातील माळीवाडगाव, दिनवाडा, बाभुळगाव, सावंगी, पाडळसा, लासूर स्टेशन यासह परिसरातील अनेक गावांमध्ये मक्याची पिके पावसाअभावी करपली आहेत. त्यामुळे उत्पन्नाची कोणतीही शक्यता नसल्याने शेतकरी उभी मका कुट्टीसाठी देत आहेत. मका पीक उभे करण्यासाठी एकरी साधारण २० ते ३० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. अनेक शेतकरी हा खर्च भागविण्यासाठी बँक अथवा खासगी सावकारांकडून कर्ज घेतात. पीक निघाल्यानंतर खर्च वजा करून उरलेली रक्कम हीच शेतकऱ्याची वर्षभराची कमाई असते.
मात्र यंदा पावसाअभावी हीच आर्थिक गणिते कोलमडली आहेत. यंदा पावसाळा चांगला होईल, असा अंदाज असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मका, सोयाबीन, भुईमूग आदी पिकांची लागवड केली. रब्बी हंगामातील गहू, कांदा, बाजरी, ज्वारी आदी पिकांसाठी जमीन वेळेत मोकळी व्हावी, या उद्देशानेही अनेक शेतकऱ्यांनी मक्याची लागवड केली होती.
मात्र दोन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. विशेषतः मका पीक सध्या कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. या काळात पिकाला मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज असते. मात्र पाऊस न झाल्याने कणसे सुकू लागली असून दाणे भरण्याआधीच पीक वाळून जात आहे.
-- बियाण्याचाही खर्च निघण्याची शक्यता नाही --
पिके वाळत असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. उभी मका काढूनही त्यातून अपेक्षित उत्पादन मिळणार नसल्याने ती जनावरांच्या कुट्टीसाठी देण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. कुट्टीतून मिळणाऱ्या पैशातून बियाण्याचाही खर्च निघणार नाही, अशी व्यथा शेतकरी व्यक्त करत आहेत.
-- शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी --
पाऊस नसल्याने जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी पुरता वैतागला आहे. हातातोंडाशी आलेली पिके वाळून जात आहेत. सध्या पावसाचे वातावरणही दिसत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आता पाऊस आला तरी झालेली नुकसानभरपाई भरून निघणार नाही. मका कणसातील दाणे न भरताच वाळत आहेत.
पीक वाळल्यानंतर ते जनावरांनाही उपयोगाचे राहणार नाही आणि शेतकरी ते काढण्यासाठीही खर्च करणार नाही. त्यामुळे उभी मका जनावरांच्या कुट्टीसाठी देण्याची वेळ आली आहे. यातून बियाण्याचाही खर्च निघणार नाही. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.














